आम्लधर्मी जमीन - ज्याही जमिनीमध्ये अम्ल याचे म्हणजेच ऍसिड चे प्रमाण जास्त असते व पीएच म्हणजेच आम्ल निर्देशांक ज्याला आपण सामु असे म्हणतो, हा 6 पेक्षा कमी असतो अशा जमिनींना आपण आम्लधर्मी जमीन असे म्हणतो. अशा जमिनीमध्ये हायड्रोजन हा खूप जास्त प्रमाणात असते व कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चे प्रमाण खूप कमी असते. याच यामुळे जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणूंची संख्या घटते व पिकांची आवश्यक असलेली अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते यामुळे अशा जमिनीमध्ये पिकांची योग्य वाढ होत नाही व उत्पादनामध्ये घट होते.
![](https://static.wixstatic.com/media/92959e_38156bf014c64f6fad53a6a67742d5d0~mv2.jpg/v1/fill/w_448,h_336,al_c,q_80,enc_auto/92959e_38156bf014c64f6fad53a6a67742d5d0~mv2.jpg)
अम्ल घटकांची संख्या वाढण्याची कारणे - आम्लयुक्त खते जास्त प्रमाणात दिल्यामुळे जमिनीत अम्ल घटकांची संख्या वाढते. यामध्ये अमोनियम सल्फेट आणि अमोनियम क्लोराईड यांचा समावेश होतो. अधिकच्या पाणी दिल्याने तसेच अधिकच्या पावसामुळे जमिनीमध्ये असलेले चुना तसेच क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येतात व पाण्याबरोबर वाहून जातात यामुळे आम्लाचे प्रमाण वाढते. जमिनीमध्ये आम्लाचे प्रमाण वाढविण्यामध्ये सूक्ष्म जिवाणूंचा ही वाटा आहे. सूक्ष्म जीवाणू द्वारे सेंद्रिय पदार्थांचे विघटन होत असताना सेंद्रिय आम्लाचे प्रमाण वाढते.
![](https://static.wixstatic.com/media/92959e_b91157bfab5244e5bfecf2eac1d12593~mv2.jpg/v1/fill/w_315,h_160,al_c,q_80,enc_auto/92959e_b91157bfab5244e5bfecf2eac1d12593~mv2.jpg)
आम्लधर्मी जमीन सुधारण्याच्या पद्धती - आम्लधर्मी जमिनीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यामुळे या जमिनीमध्ये चुना या भुसुधारकाचा उपयोग करून जमिनीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढवता येतो. असल्या आम्लधर्मी जमिनीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढविण्यासाठी चुनखडी, भाजलेला चुना किंवा कळीचा चुना यांचा वापर आपण भुसुधारक म्हणून करू शकतो.
आपण जी चुनखडी जमिनीत टाकतो त्या चुनखडीचा कार्बन डायऑक्साइड वायूशी रासायनिक क्रिया होऊन बायकार्बोनेट तयार होतात व नंतर त्याची मातीच्या विविध कलीलांशी क्रिया होऊन मातीतील कलिल कनांच्या वर कॅल्शिअमचे प्रमाण वाढू लागते. जमिनीची नांगरणी झाल्यानंतर व पिकाच्या पेरणीच्या खूप आधी चूना जमिनीमध्ये मिसळणे गरजेचे आहे. यासाठी योग्य प्रमाणात चुना देणे गरजेचे ठरते. एक हेक्टर जमिनीचा सामू आपल्याला जर एक अंशाने वाढवायचा असेल तर यासाठी 15 क्विंटल इतके कॅल्शियम कार्बोनेट किंवा चुना जमिनीमध्ये टाकणे गरजेचे आहे. चुना टाकतांना आपण वर सांगितल्याप्रमाणे विविध प्रकार वापरू शकतो. यामध्ये प्रामुख्याने चुनखडी (CaCO3) सर्वत्र वापरली जाते.
लेखक - श्री. ज्ञानेश्वर पवार ( संस्थापक अध्यक्ष, कृषी मित्र फाउंडेशन )
Comments