१) जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरेसा पुरवठा करणे हा सेंद्रिय कर्ब वाढविण्याचा रामबाण उपाय आहे. उदा. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, कोंबडी खत, प्रेसमड केक, प्रेसमड केकचे कंपोस्ट, हिरवळीची पिके, अखाद्य पेंडी (निंबोळी पेंड, करंज पेंड, सरकी पेंड इ.) २) जनावरे जोपासणे अवघड ठरत आहे. त्यांची संख्या कमी होत चालल्याने शेणखताचा पुरेसा वापर शेतात होण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. मात्र शेणखत अपुरे आहे किंवा उपलब्ध नाही म्हणून रासायनिक खतांचा अधिक वापर धोकादायक ठरू शकतो. कारण सेंद्रिय खतांसाठी कोणतेही रासायनिक खत पर्याय ठरू शकत नाही. ३) एक सेंद्रिय खत उपलब्ध नसेल, दुसऱ्या सेंद्रिय खतांचाच पर्याय योग्य ठरतो. उदा. उसाचे पाचट न जाळता शेतातच कुजवणे. पिकांची फेरपालट करून नत्र स्थिरीकरण करणारी पिके घेणे. ४) जमिनीस आवश्यक विश्रांती दिल्यावरही सेंद्रिय कर्ब टिकण्यास मदत होते. ५) पिकांसाठी रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करावा. ६) पिकांच्या गरजेनुसारच पाण्याचा वापर करावा. ७) निसर्गातील सेंद्रिय पदार्थ हे जमिनीच्या दृष्टीने मोलाचे असतात. उदा. शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष इ. पासून सेंद्रिय खत करून वापर करावा. ८) हिरवळीच्या पिकांचा (उदा. ताग, धैंचा, चवळी इ.) सेंद्रिय कर्ब वाढण्यास खूप फायदा होतो. पीक पद्धतीत या पिकांचा आवर्जून समावेश करावा. योग्य वेळी ती जमिनीत गाडावीत. ९) जमिनीत जिवामृत, व्हर्मिवाश यांचाही वापर करावा. १०) पीक पद्धतीमध्ये एकच पीक सातत्याने घेऊ नये. त्यात वेळोवेळी बदल करावेत. ११) आपण पिकाच्या अधिक उत्पादनक्षम जाती निवडत असल्यामुळे त्यांच्या पोषकतेचाही व्यवस्थित विचार करावा. सेंद्रिय खतात सर्व प्रकारची अन्नद्रव्ये अल्प प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त वेगवेगळी विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके (हार्मोन्स) आणि जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) मिळतात. यामुळे उत्पादनाचा दर्जा (उदा. गोडी, रंग इ.) आणि रोग, कीड प्रतिकारकशक्ती वाढते. १२) सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरात अधिक असून, या थराची धूप होणार नाही, याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे जमीन आणि पीक व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय कर्ब वाढीचा गांभीर्याने विचार करावा. -------------- डॉ. प्रमोद जगताप, ९४२२०७१२९३ (मृदा शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)
top of page
![](https://static.wixstatic.com/media/75be96_e9108e608f0b40b6b036e0d45d191812~mv2.jpg/v1/fill/w_1024,h_1024,al_c,q_85,enc_avif,quality_auto/75be96_e9108e608f0b40b6b036e0d45d191812~mv2.jpg)
bottom of page
Comments